
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उद्या शोभायात्रा; पवित्र कलशांचेही होणार वितरण, ” मोठ्या संख्येने उपस्थित राहा “, आ. श्वेताताई महाले यांचे आवाहन
MH 28 News Live, चिखली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक दिन विशेष महत्त्वाचा आहे. याच अनुषंगाने आ. श्वेताताई महाले यांच्या संकल्पनेतून दि. २ जून रोजी शहरांमध्ये भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून रायगडावरील पवित्र माती आणि जलाच्या कलशांचे वितरण देखील गावोगावी करण्यात येणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन आ. महाले यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक दिन या २०२३ साली सर्वत्र जण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. याचाच एक भाग म्हणून आ. श्वेताताई महाले ह्यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या सुवर्णक्षणाचा साक्षीदार असलेल्या दुर्गराज रायगड किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीत त्यांनी तेथील पवित्र जल व माती आणली आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर या पवित्र जल व मातीचे पुजन व्हावे या उदात्त हेतूने उद्या , दि. २,जून, रोजी दुपारी ४:३० वा. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर
प्रत्येक गावातील शिष्टमंडळाकडे आ. श्वेताताई महाले यांच्या शुभहस्ते पवित्र जल व मातीच्या कलशाचे वितरण होणार आहे. त्यानंतर येथूनच सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणारी ही शोभायात्रा जयस्तंभ चौक, बाबुलाँज चौक व डीपी रोड मार्गे महाराणा प्रताप पुतळा आणि बस स्थानकाच्या रस्त्याने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात परतणार आहे.
आ. श्वेताताई महाले यांचे आवाहन
‘ रयतेचा राजा ‘ असलेले लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेचे राज्य प्रस्थापित केले, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्याही जाती-धर्माच्या बंधनापलिकडले होते. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीच्या सुवर्ण क्षणाला उजाळा देण्यासाठी, ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व जाती-धर्मातील शिवप्रेमी बंधू-भगिनी व तरुणांनी, सर्व राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.