चिखली मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी सुनील वायाळ यांची नियुक्ती
MH 28 News Live, चिखली : भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते सुनील वायाळ यांची पक्षाच्या चिखली विधानसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका पत्राद्वारे वायाळ यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
सुमारे २५ वर्षांपासून सुनील वायाळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटनांच्या माध्यमातून सक्रिय आहेत. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पडल्या आहेत. यापूर्वी वायाळ यांची प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. युवकांचे जिल्ह्यामध्ये संघटन उभे करण्यामध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचे वायाळ यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. चिखली शहर व ग्रामीण भागातील शेतकरी व कार्यकर्त्यांशी सुनील वायाळ यांचा दांडगा संपर्क आहे. या सर्व बाबींचा विचार करून पक्षाच्या वरिष्ठांनी वायाळ यांचे नाव चिखली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकप्रमुख पदासाठी प्रदेश कार्यकारणीकडे पाठवले व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वायाळ यांची या पदावर नियुक्ती केली.
भारतीय जनता पक्षाच्या चिखली विधानसभा मतदारसंघ निवडणूकप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल आ. श्वेताताई महाले, जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अँड. विजय कोठारी, सुरेशअप्पा खबुतरे, ह. भ. प. प्रकाश महाराज जवंजाळ आदी नेत्यांनी सुनील वायाळ यांचे अभिनंदन केले आहे. पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी व विश्वास आपण सार्थ ठरवू आणि चिखली मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जाळे अधिक मजबूत करु अशी प्रतिक्रिया सुनील वायाळ यांनी आपल्या नियुक्ती संदर्भात व्यक्त केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button