
पोलिसांच्या गस्ती पथकाने केला इंधन चोरांचा पर्दाफाश; दोघांना अटक
MH 28 News Live, दुसरबीड : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरबीड पोलीस ठाण्याअंतर्गत होणाऱ्या डिझेल चोरीचा तपास पोलिसांनी लावला असून दोन डिझेल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे इंधन चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होईल असा अशी आशा व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस मदत केंद्र दुसरबीड व उपकेंद्र फर्दापूर दरम्यान उभ्या असलेल्या जड वाहनातील डिझेल चोरणारांनी धुमाकूळ घातला आहे. महामार्गावर टोलनाक्यांचा आसरा घेत वाहन चालक हे रात्रीला आराम करण्यासाठी, आपले वाहन उभे करतात. वाहन चालकांना झोप लागल्यानंतर डिझेल टाकीचे ‘लॉक’ तोडून गाडीमधील डिझेल स्वयंचलीत मोटारपंपाच्या साह्याने पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्या स्वतःच्या कॅनमध्ये भरून चोरटे मोकळे होतात. इंधन चोरीच्या वाहनचालकांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यासाठी शोध मोहीम राबवूनही डिझेल चोर हाती लागत नव्हते.
काल १४ जून रोजी रात्री ११.२५ वाजताच्या दरम्यान पोलिस पथकाची रात्रीची गस्त सुरु होती. समृद्धी महामार्ग चॅनेल क्र. ३१० जवळच्या पेट्रोल पंपानजीक डिघोळे यांच्या हॉटेलवर दोन जण चहापाणी करण्यासाठी थांबले होते. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार, कर्मचारी दिनकर राठोड, अरुण भुतेकर व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान सचिन सनान्से, उमेश नागरे, चालक गणेश चाटे आदिंना एक स्कार्पिओ (एम. एच. १५ – ईबी – ०४८७) आढळून आली. गस्त चमूने त्यांची विचारपूस केली असता दोघांनी उडवाउडीची उत्तरे दिली. दुसऱ्या स्विफ्ट डिझायरच्या चालकाने पोलिसांना पाहताच जालना दिशेने भरधाव वेगात धूम ठोकली. त्यामुळे संशय आणखी बळावल्याने पोलीस पथकाने स्कार्पिओची तपासणी केली. तेंव्हा त्यात ३५ लिटर क्षमतेच्या पाच ते सहा रिकाम्या कॅन्स आढळून आल्या.
दोघांनीही आपण डिझेल चोरण्यासाठी आलो होतो, हे कबूल केले. त्यांची नावे शेख अल्ताफ शेख आयुब वय २४ वर्षे रा.दहेरकर वाडी, जुना जालना व मोहम्मद फैजान मोहम्मद रफीक वय २८ वर्षे राहणार संजयनगर, जुना जालना अशी आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बीबी, ता. लोणार यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महामार्ग पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, नागपूर ह्यांनी गस्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच गस्त पथकाला योग्य ते बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.