
गुलाबराव गेले वळसे पाटील आले… अजितदादांचे आजारपण संपले, बुलढाण्यासह ११ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा झाला फैसला !
MH 28 News Live : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारी पडल्यानंतर अखेरीस पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली आहे. एकूण ११ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळाले आहे. यात काहींची उचलबांगडी करण्यात आली आहे तर काही जणांना नव्याने संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांना अमरावती आणि सोलापूरची जबाबदारी दिली असून बुलढाणा जिल्ह्याचे पालकत्व शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आले आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्याकडील बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिली आहे.
तानाजी सावंत यांच्याकडे असलेली परभणीची जबाबदारी आता संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जबाबदारी आता दीपक केसरकर यांकडून काढून घेत हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असेल. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडील गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी आता धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे असेल.
पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांऐवजी अजित पवारांकडे असणार आहे. नंदूरबार जिल्ह्याची जबाबदारी विजय कुमार गावितांकडून काढून घेत ती अनिल पाटलांकडे देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील भंडारा जिल्हा आता विजय कुमार गावितांकडे देण्यात आली आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार