
समृद्धी महामार्गावर गांजाची तस्करी २४ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक
MH 28 News Live : ट्रक मधून गांज्याची तस्करी करणार्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील साब्रा गावाजवळ अटक केली असून त्यांच्याजवळ जवळपास २४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेतील दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दि. ६ ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा- बुलडाणा यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार नागपूर येथुन तस्कर हे गांजा नावाचा अंमली पदार्थ एका ट्रक मध्ये घेऊन मेहकर शहराकडे येत आहेत. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर हद्दीतील साब्रा शिवारामध्ये समृध्दी महामार्गावर सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अंमली पदार्थ (गांजा) आढळून आला.
या कारवाईत आरोपी अब्दुल गफुर रशिद ३२ रा. जाफरचाळी, जुना जालना, मो. आबीद मो. सादीक ३५ रा. आलेगांव ता. पातुर जि. अकोला यांचे ताब्यातून गांजा ४३ किलो २०० ग्रॅम किंमत ८ लाख ६४ हजार रुपये आणि एक ट्रक किंमत १५ लाख रुपये असा एकूण २३ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यातील २ आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्रकरणी आरोपी विरुध्द पो.स्टे. मेहकर येथे एन.डी.पी.एस.अर्थात अंमली औषधी द्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई सुनील कडासने पोलीस अधीक्षक बुलडाणा यांचे आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे सपोनी विलास कुमार सानप, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदम वार, पोलीस कर्मचारी सुधाकर काळे,दिपक लेकुरवाळे,शरद गिरी, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरताळे, गजानन गोरले, जयंत बोचे, दिपक वायाळ, विजय मुंढे, राहूल बोर्डे, विलास भोसले यांच्या पथकाने पार पाडली.