
निवडणूक मध्य प्रदेशात; टेंशन बुलढाणा जिल्ह्याला… काय आहे नेमका प्रकार ते वाचा !
MH 28 News Live : येत्या काळात देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा झाल्या करण्यात आल्यात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका देशात पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जात आहे.
येत्या 17 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिसांनी आता चेकपोस्ट उभारले आहेत. राज्य सीमेवर प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मध्यरात्री एबीपी माझानं राज्य सीमेवरील चेकपोस्टचा रिअॅलिटी चेक केला.
येत्या काळात मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्यातील निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात इतर राज्यातून अवैध दारू किंवा पैसा येऊ नये म्हणून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त चेकपोस्ट राज्य सीमेवर उघडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची या चेकपोस्टवर नोंद घेऊन कडक तपासणी करण्यात येत आहे.
मध्यप्रदेशच्या करौली सीमेवरून अनेकदा अवैधपणे दारू, हवालाचा पैसा अशी वाहतूक होत असते. असे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. पण आता निवडणुका जाहीर झाल्यानं आम्ही या ठिकाणी चोवीस तास सशस्त्र पोलिसांचा पहारा देत आहोत, प्रत्येक वाहानांची तपासणी करून नोंद घेत असल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. तसेच, या मार्गावरून जाणाऱ्या, येणाऱ्या काही वाहनचालकांना मध्यप्रदेश पोलीस पैसे घेऊन आणि वाहन तपासणी न करता सोडून देत असल्याचा आरोप केला आहे.