
रेल्वे लोकआंदोलन समितीच्या समर्थनार्थ निघाला महामोर्चा खामगाव – जालना रेल्वेमार्गाला ५० टक्के राज्य हिस्सा त्वरित द्या अशी केली आग्रही मागणी
चिखली : रेल्वे लोकआंदोलन समितीतर्फे चिखली तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या सत्याग्रह व साखळी उपोषणाचा आज २५ वा दिवस होता. खामगाव – जालना रेल्वेमार्गाला राज्य शासनाने ५० टक्के निधी मंजूर करावा या मागणीसाठी सुरू झालेल्या या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी दि. ५ फेब्रुवारी रोजी शहरात सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन काढलेला हा महामोर्चा आंदोलन स्थळी पोहचल्यानंतर प्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत तहसीलदारांच्या मार्फत राज्य शासनाला मुख्यमंत्र्यांची नावे निवेदन सादर केले. याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मागील ११४ वर्षापासून प्रलंबित असलेल्या खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समिती १२ जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह व साखळी उपोषण करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत चालला असून आज निघालेल्या महामोर्चामुळे चिखली शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही या आंदोलनाचे लोन पोहोचल्याची प्रचिती आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ झाला. खामगाव – जालना रेल्वेमार्गाची मागणी करणाऱ्या टोप्या, फलक आणि झेंडे घेऊन नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. ” खामगाव – जालना रेल्वेमार्ग झालाच पाहिजे “, ” राज्य सरकारने ५० टक्के हिस्सा मंजूर केलाच पाहिजे ” अशा घोषणा देत हा मोर्चा जयस्तंभ चौक व बाबू लॉज चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. तेथे सुरू असलेल्या आंदोलनास भेट देऊन विविध पक्षांच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या भावना व्यक्त केल्या. रेल्वे लोकआंदोलन समितीने सुरू केलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा असून राज्य शासनाने खामगाव – जालना रेल्वे मार्गाकरता ५० टक्के राज्य हिस्सा मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित मंजूर करावा अशी एकमुखी मागणी याप्रसंगी सर्व वक्त्यांनी लावून धरली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना शिंदे गट, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह व्यापारी असोसिएशन, एमआयडीसी उद्योजक संघटना, माजी सैनिक संघटना, चिखली तालुका पत्रकार संघ, चिखली शहर फोटोग्राफर असोसिएशन, बारा बलुतेदार कामगार संघटना, महात्मा फुले समता परिषद आदी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, व्यावसायिक संघटना, स्वयंसेवी संस्था, असोसिएशन यांच्या प्रतिनिधींनी आपले समर्थनपर मनोगत व्यक्त केले. या मोर्चासाठी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, सदस्य तसेच शेकडोच्या संख्येत चिखली शहर व ग्रामीण भागातील नागरिक सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार हरी वीर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केल्यानंतर मोर्चाचा समारोप झाला. या महामोर्चाद्वारे चिखली शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय व सर्व संघटनांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने महामोर्चाच्या आयोजकांचे आभार मानण्यात आले.