खामगाव – जालना रेल्वे मार्गाबाबत आ. डॉ. संजय कुटे म्हणाले की.. .
चिखली : रेल्वे लोक आंदोलन समितीने जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय हाती घेतला असून या सत्याग्रह व साखळी उपोषणास नक्कीच यश येईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी खामगाव – जालना रेल्वेमार्गास राज्य सरकार ५० टक्के निधी मंजूर करेल असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केला. दि. १२ फेब्रुवारी रोजी आंदोलन मंडपास भेट दिली असता सत्याग्रहींशी केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.
न्यायालयीन कामासाठी आ. डॉ. संजय कुटे हे चिखली येथे आले असता त्यांनी आवर्जून रेल्वे लोकआंदोलन समितीच्या सत्याग्रहास भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांची आस्थेने विचारपूस करत आंदोलनाविषयीची सविस्तर माहिती घेतली. रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य रेणुकादास मुळे, संतोष लोखंडे, अनुप महाजन, कैलास शर्मा, रामकृष्ण लोखंडे, सुखदेव खंडागळे, कैलास इंगळे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे, पत्रकार योगेश शर्मा रवींद्र फोलाने, गणेश धुंदळे, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, विधी आघाडीचे एड. दिलीप यंगड, विजय वाळेकर, नामू गुरुदासानी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन त्वरित पूर्ण करावे – रेल्वे लोकआंदोलन समितीची अपेक्षा
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात १३ जानेवारी रोजी चिखली येथे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान खामगाव – जालना रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के निधी लवकरात लवकर मंजूर करेल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर करावी अशी मागणी यावेळी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. चिखली शहर व तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील अन्य भागातून देखील सत्याग्रह व साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून शासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी व त्वरित या रेल्वे मार्गासाठी ५० टक्के राज्य हिस्सा मंजूर करावा अशी जनभावना देखील यावेळी आ. कुटे यांच्या कानावर घालण्यात आली.
लोकसभा आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी मिळेल आ. डॉ. कुटे
खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी मंजूर करावा यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझा सातत्याने संपर्क असून व्यक्तीश : या प्रकरणात मी लक्ष घातले आहे त्यामुळे या रेल्वे मार्गाला आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ५० टक्के राज्य हिस्सा मंजूर होईल असा ठाम विश्वास आ. डॉ. संजय कुटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button