
खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार ५० टक्के निधी देणार; अजित दादा पवार यांची अंतरीम अर्थसंकल्पात घोषणा
चिखली : सुमारे ११४ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या व बुलढाणा जिल्ह्याची भाग्यरेखा ठरणाऱ्या खामगाव ते जालना या संकल्पित रेल्वेमार्गासाठी ५० टक्के राज्य हिस्सा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केली. दि. २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेत अंतरीम अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी याबद्दलची माहिती दिली. या घोषणेनंतर प्रत्यक्षात राज्य सरकारकडून केंद्रीय रेल्वे बोर्डाला याबाबत पत्र कधी पाठवले जाते याची प्रतीक्षा मात्र जिल्ह्यातील जनता करत आहे.
खामगाव ते जालना या रेल्वे मार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडून गेल्या वर्षी देखील अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्के निधीची तरतूद करण्याची घोषणा केली होती. मात्र, वर्षभरात यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. दरम्यान रेल्वे लोक आंदोलन समितीतर्फे दि. १२ जानेवारीपासून चिखली तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. ४२ दिवस हा सत्याग्रह चालला. आ. श्वेताताई महाले यांच्या आश्वासनानंतर हे साखळी उपोषण मागे घेण्यात आले. राज्य सरकार लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी खामगाव – जालना रेल्वे मार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर करेल असे आश्वासन आ!आ. महाले यांनी दिले होते. विधानसभेत अंतरीम अर्थसंकल्प सादर करताना अजितदादा पवार यांनी या संदर्भात घोषणा तर केली परंतु, राज्य सरकारकडून या रेल्वेमार्गासाठी ५० टक्के निधी मंजूर केल्याचे पत्र केंद्रीय रेल्वे बोर्डाला पाठवल्याशिवाय या घोषणेला मूर्त रूप येऊ शकणार नाही हे मात्र खरे.