
‘ वंचित ‘ हा शब्द खऱ्या अर्थाने आम्हाला लागू होतो – सतीश शिंदे चिखली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे केली उमेदवारीची मागणी
MH 28 News Live / चिखली : ” वंचित बहुजन आघाडीमधील ‘ वंचित ‘ हा शब्द खऱ्या अर्थाने आम्हाला लागू होतो कारण, आम्ही सर्वार्थाने वंचित आहोत, मायक्रो ओबीसी आहोत. म्हणून मी; या उपेक्षित घटकाला न्याय मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून चिखली विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवू इच्छितो ” अशा शब्दात बारा बलुतेदार चळवळीचे शिलेदार व कामगार नेते सतीश शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली असून चिखली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. दि. ९ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे शासकीय विश्रामगृहात वंचितच्या निरीक्षकांसमोर शिंदे यांनी मुलाखत दिली. यावेळी चिखली मतदारसंघातील बारा बलुतेदार व ओबीसी समाजातील शिंदे यांचे समर्थक उपस्थित होते.
चळवळीतून पुढे आलेले कार्यकर्ते व संघटक म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात करणारे सतीश शिंदे यांचे राजकारणाबाहेरही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. बारा बलुतेदार कामगार संघटना स्थापन करून त्यांनी बांधकाम कामगारांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न मागील दहा-पंधरा वर्षांपासून चालवला आहे. याशिवाय शिंदे हे ओबीसी चळवळीमध्ये देखील सक्रिय असतात. या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यकर्ते जोडले असून विविध कार्यक्रम व उपक्रमांमधून आपली सक्रियता त्यांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे.
सतीश शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षापासून झाली. तेथे त्यांनी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पद भूषवले. २०१३ मध्ये शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपात देखील कामगार जिल्हाध्यक्ष पद सतीश शिंदे यांनी सांभाळले. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिंदे यांनी भाजपला रामराम करत पुन्हा काँग्रेसमध्ये ‘ घर वापसी ‘ केली. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीकडे तिकिटाची मागणी करत सतीश शिंदे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार श्वेताताई महाले यांना भाजपची तर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी निश्चित समजली जाते. या दोघांमध्ये तिसरा कोण ? हा प्रश्न चर्चिला जात असताना सतीश शिंदे यांचे नाव पुढे येत असल्याने दोन प्रस्थापित नेत्यांच्या मध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता ‘ वंचित ‘ कडून उभा राहिला तर निवडणुकीचे चित्र काय असेल याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावायला मात्र सुरुवात झाली आहे.