♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अनैतिक संबंधात पती आणत होता घाटा; म्हणून पत्नीने काढला प्रियकराच्या मदतीने काटा

MH 28 News Live, सिंदखेडराजा : तालुक्यातील गोरेगाव येथे अनैतिक संबंधात अडचण वाटणार्या पतीचा आपल्या प्रियकराच्या मदतीने पत्नीने काटा काढला. काल दि. १५ मार्चला समोर आलेल्या या प्रकारामुळे सिंदखेड राजा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ह्या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन साखरखेर्डा पोलिस पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणातील मयत दत्तात्रय रुपलाल कव्हळे याची आई तुळसाबाई रुपलाल कव्हळे ( ६५ ) वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मोठा मुलगा दत्तात्रय रुपलाल कव्हळे ( ४० ) हा कुटुंबापासून वेगळा राहत होता. त्याला पत्नी मीरा, दोन मुले व एक मुलगी आहे. सुमारे पंचवीस दिवसांपूर्वी दत्तात्रय कव्हळे ह्याने पत्नी व तिच्या प्रियकराच्या प्रेमसंबंधाची रेकॉर्डिंग पकडली होती. त्यानंतर त्याने पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी मीरा हिला तिचा भाऊ अनिल खनसरे ह्याने तिला गोरेगाव येथे पुन्हा आणून सोडले होते. त्यावेळी दत्तात्रय ह्याला कुटुंबीयांनी समजावून सांगितले; तसेच दत्तात्रय व मीरा ह्या दोघा पतीपत्नीला कामासाठी अहमदनगर येथे पाठवले. परंतु, बायकोच्या बाहेरच्या प्रेमसंबंधाच्या मानसिक ताणामुळे दत्तात्रय हा दारु प्यायचा.

पत्नीच्या बाहेरख्याली वागण्यामुळे आतून तुटत चालला होता. असे असताना कव्हळे कुटुंबीयांना शेत जमीन विकत घ्यायची होती. त्यासाठी त्याला बोलावले असल्याने दत्तात्रय कव्हळे हा दि. १४ मार्च रोजी घरी आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ मार्चला सकाळी आईकडे जाऊन शेतीच्या खरेदी संदर्भात चर्चा केली व मुलगी रोशनी हिचा पेपर असल्याने तिला साखरखेर्डा येथे घेऊन गेला. त्यानंतर दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान फिर्यादी तुळसाबाई व त्यांचा दुसरा मुलगा अशोक कव्हळे हे दत्तात्रयच्या घराकडे गेले. ते दोघे तेथे पोहचले असता गावातीलच पठाण नामक व्यक्ती तेथून पळून जात असल्याचे या दोघांनी पाहिले. ते दोघे घरात गेले तेंव्हा पाय रुमालाने पलंगाला बांधलेल्या व तोंडावर चादर टाकलेल्या अवस्थेत त्यांना दत्तात्रय आढळला. त्यावेळी तुळसाबाई ह्या त्याच्याकडे जात असतांना त्यांची सून मीरा दत्तात्रय हे झोपलेले असून त्यांना उठवू नका असे म्हटले. त्यामुळे त्या तेथून आपल्या घरी निघून गेले.

सुमारे दोन तासांनी दत्तात्रयची पत्नी मीरा हिने दत्तात्रयच्या आईला फोन केला. आपला नवरा दत्तात्रय हा काहीच हालचाल करत नसल्याचे तीने फोनवर सांगितले, त्यावरुन तुळसाबाई व त्यांचा दुसरा मुलगा अशोक लगबगीने दत्तात्रयच्या घरी पोहचले. तेथे जाऊन पाहिले असता दत्तात्रय पलंगावर पडलेल्या अवस्थेत व त्याच्या गळ्याला गळफास लावल्याचे व्रण दिसून आले. त्यानंतर गावातील एका गाडीतून दत्तात्रय ह्याला साखरखेर्डा व तेथून चिखली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दत्तात्रय ह्यास मृत घोषित केले. उपचारासाठी दवाखान्यात येत असतांना गाडीत सून मीरा हिने आपण व आपला प्रियकर एजाजखान शहजादखान पठाण दोघांनी मिळून दत्तात्रय ह्याचे पाय रुमालाने बांधून व गळ्याला दोरीने आवळून गळफास लावून मारल्याचे सांगितले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

साखरखेर्डा पोलिसांनी ह्या प्रकरणी अप. नं. ६० / २०२२ कलम ३०२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून मृतकाची पत्नी आरोपी मीरा दत्तात्रय कव्हळे, वय ३६ वर्षे व एजाजखान शहजादखान पठाण, वय ४५ वर्षे दोघेही रा. गोरेगाव ह्यांना अटक केली आहे. ह्याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार जितेंद्र आडोळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कानडे व सहकारी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129