
मोताळ्यात मध्यरात्री भीषण आग; तीन दुकाने भस्मसात, लाखोंचे नुकसान; अग्निशमन यंत्रणेअभावी आग अधिक पसरली; नागरिकांमध्ये संताप
MH 28 News Live / मोताळा : येथील आठवडी बाजार परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून तीन दुकाने जळून खाक झाली. जय भवानी किराणा, जय इलेक्ट्रिकल्स आणि एक हेअर सलून या तीन दुकाने आगीत भस्मसात झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग रात्री १२ च्या सुमारास लागली असून ती झपाट्याने पसरली. किराणा व इलेक्ट्रिकल्स दुकानांतील माल, विशेषतः उन्हाळी हंगामासाठी ठेवलेले पंखे, कुलर यासह सगळीच सामग्री जळून खाक झाली. ही आग लागल्यानंतर जवळपास ४० मिनिटांनी बुलढाणा व मलकापूर येथील अग्निशमन पथके घटनास्थळी पोहोचली आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.
मोताळा नगरपंचायत कार्यरत असताना देखील येथे स्वतःची अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही, ही बाब गंभीर असून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भविष्यात अशा आणखी घटनांमध्ये मोठे नुकसान होऊ नये म्हणून मोताळ्यात तात्काळ फायर ब्रिगेडची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आता होत आहे.