
Crime News – बदनामीने घेतला जीव ! प्रेमसंबंधाचा आरोप करून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
MH 28 News Live / मोताळा : मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे खोटे आरोप करत समाजात तिची बदनामी करण्यात आली. तिच्यावर मानसिक छळ करत तिला थेट जीव घेण्याची धमकीही देण्यात आली. अखेर या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने विषारी द्रव्य प्राशन करून आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता राजू सोळंके (वय २१, रा. दाताडा, ह.मु. तालखेड, ता. मोताळा) या तरुणीने आपल्यावर होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्यावर आरोपींनी समाजात खोटी बदनामी करत सतत जाच केला. यासंदर्भात बेबीबाई राजू सोळंके यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार व प्रमीला हिरामण पवार (सर्व रा. परडा फाटा, ता. मोताळा) यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी लता हिचे विश्वजित या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा गैरसमज पसरवत समाजात तिची बदनामी केली आणि तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने लताने विष प्राशन करत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम 108, 351(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.