♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धक्कादायक ! मेहकरच्या डॉक्टरला चाकूचा धाक दाखवत लुटमार; बनावट फोटो व्हायरल करून खंडणीची मागणी, सहा आरोपींवर गुन्हा दाखल

MH 28 News Live / मेहकर : येथील एका डॉक्टरला रस्त्यात गाडी अडवून चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा आणि बनावट फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी यापैकी चार आरोपींना अटक केली आहे.

डॉ. अनिल शंकरराव गायकवाड (वय ५५, रा. बालाजीनगर, मेहकर, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते हिंगोलीहून मेहकरकडे जात असताना मुंगसाजीनगर, रिसोड येथे एका महिलेने त्यांच्या गाडीसमोर येऊन “मला ओळखत नाहीस का?” असे विचारले. त्याच वेळी तीन दुचाकींवरून आलेल्या सहा जणांनी (पाच पुरुष व एक महिला) गाडीमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला.

आरोपींपैकी एकाने चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची, अंदाजे १.१० लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली. दुसऱ्या आरोपीने जबरदस्तीने डॉक्टर व संबंधित महिलेसोबतचे फोटो काढले. या गोंधळात आरोपींनी गाडीतून एक लाख रुपयांची रोख रक्कमही चोरली.

या घटनेनंतर १९ मे रोजी या बनावट फोटोच्या आधारे डॉक्टरकडे ५० हजार रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. या गुन्ह्यात बबलू तायडे, अक्षय खंडारे, गणेश वाकोडे, विजय पिसुळे (सर्व रा. रिसोड) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले करत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129