
हृदयद्रावक…! मित्राच्या साखरपुड्यासाठी आलेल्या ‘ त्याला ‘ मृत्यूने मारली मिठी… मेरा बुद्रुक येथील तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा अकाली अंत
MH 28 News Live / चिखली : तालुक्यातील मेरा बुद्रुक गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी काही दिवसांची सुट्टी घेऊन घरी आलेल्या एका युवा पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
गणेश सुखदेव डोंगरदिवे (वय २३), हा होनहार पोलीस जवान आपल्या मित्राच्या आनंदात सहभागी होण्यासाठी घरी आला होता. मोताळा तालुक्यातील ग्रामीण भागात आपल्या मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून दुचाकीवरून परत येत असताना झालेल्या अपघातात गणेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. २१ जून रोजी सकाळी त्याचा मृतदेह गावात पोहोचला, तेव्हा संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.
गणेश डोंगरदिवे याच्या अंत्ययात्रेत शेकडो गावकरी, नातेवाईक, मित्र व सहकारी सहभागी झाले होते. गावाच्या मातीने घडलेला हा जवान मुंबई पोलिस दलात कार्यरत असूनही आपल्या मूळ गावी कायम संपर्कात राहत असे. त्याच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील स्मशानभूमीत त्याच्यावर पोलिस इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात झालेल्या मानवंदनेने वातावरण आणखी भावविवश झाले. कर्तव्यभावनेने झपाटलेल्या या तरुणाचं आयुष्य एवढ्या लवकर संपेल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
त्याच्या पश्चात आई-वडील, भावंडं व संपूर्ण गावकऱ्यांचा आधार गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. एक होतकरू, मनमिळावू व जबाबदार तरुण असा होत्याचं नव्हतं झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे.