
मेहकर तालुक्यातील रहिवासी गजानन रायगड जिल्ह्यात होता ग्रामसेवक; एक दिवस झाला तो बेपत्ता… जंगलात आढळला कुजलेला मृतदेह, मृत्यूचे रहस्य उलगडेना.
MH 28 News Live / मेहकर : तालुक्यातील भोसा येथील रहिवासी असलेले ग्रामसेवक गजानन विठ्ठल गाढवे (वय ३५) यांचा रायगड जिल्ह्यातील महाड येथे दुर्दैवी अंत झाला. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गाढवे यांचा मृतदेह सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी महाड तालुक्यातील दहिवड गावाच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे मेहकर तालुक्यातील भोसा गावासह महाड परिसरात खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
गजानन गाढवे हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या ते महाडमधील शिरगाव येथे महेश जाधव यांच्या घरी वास्तव्यास होते. ५ नोव्हेंबर रोजी ते कामानिमित्त महाड पंचायत समितीमध्ये गेले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीय आणि परिचितांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु काहीच माहिती मिळाली नाही. अखेर त्यांचे भाऊ विलास विठ्ठल गाढवे यांनी ८ नोव्हेंबर रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी गजानन यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करणारी तक्रार दाखल केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
दरम्यान, गजानन यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांसह अन्य ग्रामसेवकही प्रयत्न करीत असतानाच ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दहिवड गावाच्या पश्चिमेकडील जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांकडून तपास सुरू
गजानन गाढवे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चार दिवस बेपत्ता राहणे, अपहरणाची तक्रार दाखल होणे आणि त्यानंतर जंगल परिसरात मृतदेह आढळणे, या घटनाक्रमामुळे मृत्यूच्या परिस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड पुढील तपास करीत आहेत. मेहकर तालुक्यातील भोसा येथील रहिवासी असलेल्या गजानन यांच्या मृत्यूचे गूढ तपासातून उलगडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



