
सदानंद नगराचा न. प. मध्ये समावेश करुन पाणीपुरवठा पाईपलाईन करुन द्यावी; रहिवाशांची मागणी
MH 28 News Live, चिखली : चिखली नगर परिषद हद्दीलगतच असलेल्या सदानंद नगराचा चिखली नगर पालिका हद्दीत समावेश करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तातडीने टाकावी अशी मागणी येथील रहिवाशी शेख सलीम शेख महेबूब यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की चिखली – साकेगाव रोडवर असलेल्या सदानंद नगरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. शहरालगत असलेल्या या नगराचा समावेश चिखली नगर पालिका हद्दीत नसल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनची व्यवस्था येथे नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी
नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. सदानंद नगराचा समावेश चिखली न.प.मध्ये व्हावा आणि पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात यावी यासाठी अनेकदा निवेदने दिली व उपोषण देखील केलेले आहे. त्यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी यांनी १५ दिवसात काम करण्याचे सांगितले होते. नंतर न.प.ने तांत्रिक मान्यता देवून चावडी ते सदानंद नगर पाईपलाईन टाकण्यासाठी चिखली न.प.ने कार्यकारी अभियंता यांचेकडून ३६,९३,३०० रुपयांचे बिल पास करुनही तसेच सर्व मंजुरी आदेश कागदोपत्री पास झाले असतांना अद्यापही कोणतेच काम झालेले नाही. तसेच न.प.हद्दवाढीला मान्यता मिळाली असता अद्याप सदानंद नगराचा चिखली न.प.मध्ये समावेश झालेला नाही तरी वरील मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी शेख सलीम शेख महेबूब यांच्यासह दशरथ गवते, मारोती वंजे, अयाज अली शहा, लक्ष्मण कर्हाडे, रामेश्वर हरणे, अशोक खंडागळे, हरी तेल्हारकर, गणेश केंधळे, सलीमखॉं पठाण, शे.राजीक, म.अबरार, अशोक गादे, सचिन खंडागळे, उत्तम वाघ, मंगेश मोळवणे आदींनी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी तहसीलदार चिखली व मुख्याधिकारी न.प.चिखली यांना देण्यात आल्या आहेत.



