राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अवश्य प्रयत्न करेल – आ. श्वेताताई महाले एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त केले प्रवाशांचे स्वागत
MH 28 News Live, चिखली : सर्वसामान्य जनतेच्या सुख – दु : खात गेली ७५ वर्षे साथ देणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस हा महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणे आवश्यक आहे. याकरिता महामंडळातील कर्मचाऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करु अशी ग्वाही आ. श्वेताताई महाले यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापनदिन कार्यक्रम प्रसंगी दि. ३ जून रोजी चिखली बस स्थानकात झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
आजपासून ७५ वर्षांपूर्वी नगर ते पुणे या दरम्यान पहिली एसटी बस धावली होती; त्यामुळे ३ जून हा एसटीचा वर्धापनदिन म्हणून दरवर्षी साजरा होतो. यंदा एसटीच्या स्थापनेचे हे ७५ वे वर्ष असल्याने अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे. या अंतर्गत चिखली आगारातर्फे बस स्थानकामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आगार प्रमुख विनोद इलामे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माजी नगरसेवक सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, शेख अनीस, शैलेश बाहेती, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर पुरोहित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चिखली आगारासाठी दिला १० लक्ष रुपयांचा निधी
सध्या असलेल्या शिंदे – फडणवीस सरकारला एसटी महामंडळाला भेडसावणाऱ्या समस्या व येणाऱ्या अडचणी यांची जाणीव आहे. त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना देखील राज्य शासन करत आहे. म्हणूनच एसटी प्रवाशांसाठी अमृत योजना तसेच महिला सन्मान योजनेद्वारे महिला प्रवाशांना लागू केलेली ५० टक्के भाडे सवलत अशा नवनवीन उपयुक्त योजना सुरू केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनांमुळे गेल्या तीन – चार महिन्यात महामंडळाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे, यातून एसटीचा तोटा भरुन काढण्यास मदत होईल असे त्या म्हणाल्या. या उत्पन्न वाढीमुळे लोकवाहिनीला पुन्हा चांगले दिवस येतील असा विश्वास आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. चिखली आगारासाठी आणखी नवीन दहा बसगाड्या व नवीन प्रसाधनगृह बांधकाम व अन्य कामांसाठी १० लक्ष रुपये आपल्या आमदार निधीतून देण्याची घोषणा आ. श्वेताताई महाले यांनी या वेळी केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आगार प्रमुख विनोद इलामे यांनी एसटी महामंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून चिखली आगाराला १० नवीन बसेस प्राप्त झाल्या, त्या बद्दल इलामे यांनी आ. महाले यांना धन्यवाद दिले. एसटी कर्मचारी अनंता सानप यांनी सुध्दा यावेळी आपले विचार मांडले. आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते चिखली – पनवेल बसचे पूजन करण्यात आले, याच बसमधून प्रवाशांसह आ. महाले यांनी आगाराला फेरी मारली व चिखली ते शेगाव या बसमधील प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. ओरिसामधील अपघातात म्रुत्यु पावलेल्या प्रवाशांना श्रध्दाताई अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप झाला. लामकाळे, बान्डे, भोन्डे, जाधव, आर. सी. गवई, भोलाने सचिन पाटील अविनाश वेडोले, प्रशात झाडगे, प्रताप वानखेडे, अनिल कोरे, राजू वायाळ, सचिन सुनंगत, पडघान सागर परदेशी, गाडेकर, भराड, श्रीमती पडघान, श्रीमती मगरलाई, श्रीमती इंगळे, श्रीमती महाडीक प्रशाशक महिला प्रतिनिधी आदी कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले तर बद्रीनाथ महाले यांनी आभार मानले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button