♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डिझेलची बोंबाबोंब… जिल्ह्यात अनेक आगारांच्या बस फेऱ्या रद्द प्रवाशांचा खोळंबा

MH 28 News Live : बस फेऱ्यांसाठी आवश्यक असलेले इंधन म्हणजे डिझेलचा बुलढाणा जिल्ह्यामधील एसटी महामंडळाच्या सर्वच आगारांमध्ये तुटवडा निर्माण झाल्या असून त्यामुळे एसटी बस फेऱ्यांवर देखील परिणाम झाल्याचे जाणवते आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील अनेक आगारांच्या जवळच्या आणि दूरच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून उद्या सायंकाळपर्यंत डिझेलचे मागणी पूर्ण झाल्यास आणखी बस फेऱ्या बंद पडण्याची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाचे एकूण ७ बस डेपो आहेत. बुलढाणा, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव, शेगाव, मेहकर आणि चिखली या सात आगारांमध्ये दररोजचे हजारो लिटर डिझेल प्रवासासाठी इंधन म्हणून उपयोगात येते. या डिझेलचा पुरवठा महामंडळाला नियमितपणे झाला तर महामंडळाची सेवा व्यवस्थित सुरू राहते. मात्र गेल्या दोन-चार दिवसांमध्ये महामंडळाच्या वेगवेगळ्या आगारांकडून बुलढाणा विभागीय कार्यालयामध्ये डिझेलचे मागणी नोंदवण्यात आल्यानंतरही विभागीय कार्यालयाकडून त्यांना तेवढ्या डिझेलचा पुरवठा न झाल्यामुळे चिखलीसह अनेक आगारांच्या काही बस फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे.

काही बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे चित्र आज अनेक बस स्थानकांमध्ये पाहायला मिळाले. याबद्दल चिखली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख कपील खेडेकर यांनी आगार व्यवस्थापकांना घेराव घालून या संदर्भात जाब विचारला असता आपण विभागीय कार्यालयाकडे डिझेलची मागणी नोंदवली असून अद्याप तिची पूर्तता झाली नसल्यामुळे याबाबत आपण समर्थ असल्याचे स्पष्टीकरण आगार व्यवस्थापकांनी दिले.

सवलतीच्या योजनांवर प्रश्नचिन्ह

महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, अपंगांना ७५ टक्के सवलत अशा अनेक सवलतीच्या योजना एसटी महामंडळाकडून राबवल्या जात आहेत. या योजना राबवूनही आपल्या महामंडळाला फायदा होत असल्याचे एसटी महामंडळ व राज्य सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. असे असतानाही जर का डिझेल सारख्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी महामंडळाकडे पैसे नसतील तर खरोखर या सवलतींचा फायदा महामंडळाला कितपत होतो हा प्रश्न देखील उपस्थित होणे साहजिक आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129