
न्यायालयाच्या आवारातच मागितली दीड कोटींची खंडणी ! कोर्ट परिसरात शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी
MH 28 News Live / मलकापूर : तालुक्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख दीपक पाटील यांच्याकडून थेट जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही धक्कादायक घटना अनेकांच्या उपस्थितीत घडल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० मे रोजी दीपक पाटील कोर्टाच्या एका कामासाठी मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात उपस्थित होते. त्याचवेळी अकोला येथील कुख्यात गणेश उर्फ बाळू धोत्रे, दिनकर धोत्रे (रा. कौलखेड खडकी) आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी पाटील यांना अडवले. या चौघांनी त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली, तसेच न दिल्यास जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
या प्रकरणी मलकापूर पोलिस ठाण्यात चारही संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु असून, आरोपींच्या पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.
न्यायालय परिसरात थेट खंडणी मागण्याच्या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची जिल्हास्तरावरून दखल घेण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे संपूर्ण मलकापूर तालुक्यात खळबळ माजली असून, राजकीय वर्तुळात देखील याची जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील तपासासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक नेमले असून, लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button