♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्रेमाचे आमिष, विश्‍वासघाताची वेदना; शेगावमध्ये २० वर्षीय तरुणीवर अत्याचार

MH 28 News Live / शेगाव : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील राजू भोनाजी अवचार (वय २८) याने पीडित तरुणीशी प्रेमाचे संबंध निर्माण केले. लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्‍वास संपादन केला. मात्र, १९ जून रोजी त्याने शेगाव येथील एका खाजगी गेस्ट हाऊसमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

या घटनेनंतर पीडित तरुणीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून राजू अवचार याच्याविरुद्ध २४ जुलै रोजी रात्री ८:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला हा गुन्हा जळगाव जामोद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता, परंतु तो पुढे शेगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारिंग हे करत आहेत.

गेस्ट हाऊसवरील संशय व पोलिसांसमोर आव्हान

या घटनेनंतर पुन्हा एकदा शेगावमधील खाजगी गेस्ट हाऊसवर संशयाचे ढग घोंगावत आहेत. अनेक वेळा अशा लॉजवर पोलिसांनी कारवाई करून ताकीद दिली आहे. परंतु, तरीदेखील या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनासाठी हे एक मोठे आव्हान बनले आहे.

कडक नियमांचे पालन अनिवार्य
शेगाव हे धार्मिक पर्यटनस्थळ असल्याने येथे राज्यभरातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. अशा ठिकाणी लॉज व गेस्ट हाऊस चालकांनी नियम व अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रत्येक लॉजमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असणे, येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवणे व त्यांची कसून चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे कठीण होईल.

या घटनेने पुन्हा एकदा प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तत्परता आशादायक असली तरी समाजानेही सजग राहण्याची नितांत गरज आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129