
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम झाला जाहीर
MH 28 News Live / बुलढाणा : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात कार्यक्रम जाहीर केला आहे. या अनुषंगाने मतदार याद्यांचे पुनरावलोकन व नवी मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा अमरावती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यासंबंधी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन ठराविक टप्प्यांत पूर्ण होणार आहे.

प्रशासनाची तयारी
या निवडणूक प्रक्रियेसाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, तर बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. मतदार नोंदणीची मुदत, छाननी, दुरुस्ती आणि अंतिम यादी जाहीर करण्याचे टप्पे ठरलेल्या वेळापत्रकानुसार राबवले जातील. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी नुकतीच सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही आता पुढे आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह प्रशासन यंत्रणाही लगबगीने कामाला लागले आहेत. या निवडणुकीत शिक्षक वर्गाच्या प्रश्नांना महत्त्व मिळणार असून विविध पक्षांच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



