♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोष्ट चिखलीच्या नगराध्यक्ष पदाची… जनतेला उमेदवार नाही, तर आधार हवा ! सचिन बोंद्रे यांचे नाव ठरत आहे आशेचा किरण

MH 28 News Live : चिखली नगरीला आज असा नेता हवा आहे जो फक्त खुर्चीवर बसणारा नाही, तर जनतेच्या मनात घर करणारा असेल. कृषीमित्र सचिन बोन्द्रे हे नाव सध्या शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात चर्चेत आहे. जबाबदार, स्वच्छ प्रतिमेचा आणि माणुसकीत रमणारा हा चेहरा चिखलीच्या आशेचा केंद्रबिंदू बनला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेसाठी कुठल्याही अटीशर्तींशिवाय २४ तास उपलब्ध असणारे बोन्द्रे हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे.

सचिन बोंद्रे यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाला चिखलीच्या जनतेने जवळून पाहिलं आहे. निवडक लोकांच्या घरी फोनची सोय असायची त्या काळापासूनच ते जनतेच्या संपर्कात राहिले आहेत. त्यांची लोकप्रियता ही माध्यमांमुळे नव्हे, तर थेट जनतेच्या मनाशी जोडलेली आहे. बोन्द्रे घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा आणि कमी वयात मिळालेलं स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार त्यांच्या प्रत्येक कृतीत झळकतात.

संस्कार, सेवा आणि विचारांचा वारसा

चव्हाण साहेब, स्व. वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम आणि स्व. राजीव गांधी यांचे विचार सचिन बोन्द्रे यांच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचा सन्मान त्यांनी मिळवला, तसेच विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘मा जिजाऊ माहेर यात्रा’ पदयात्रेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांचे निकटचे सहकार्य त्यांना लाभले असून सचिन बोंद्रे हे या तिघाही नेत्यांच्या ‘ गुड बुक ‘ मध्ये आहेत. पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याशी संपर्क ठेवणं, सर्व स्तरांवरील मतभेदांवर तोडगा काढणं या त्यांच्या शैलीने त्यांना जनतेच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. राजकारणात त्यांनी कधीही भेदभाव ठेवला नाही. तरुणांशी संवाद साधत, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारा हा नेता आजही साधेपणाने जगतो. कॉलेज जीवनापासूनच त्यांनी गल्लीतून दिल्लीपर्यंत आपली ओळख केवळ कामाच्या बळावर निर्माण केली आहे.

जनतेशी नातं आणि साधेपणाचं मोठेपण

महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांशी वैयक्तिक संबंध असूनही सचिन बोन्द्रे यांनी कधीच पदाचा अहंकार मनात आणला नाही. सर्वसामान्य नागरिक असो वा प्रतिष्ठित व्यक्ती कोणालाही ते सहज भेटतात, मनमोकळेपणाने बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा साधेपणा आणि वर्तनातील आपुलकी लोकांना “हा आपलाच माणूस” अशी भावना देते.

चिखलीतील प्रत्येक वार्ड, गल्ली आणि प्रभागात त्यांचं नाव आहे. “हा माणूस सुखात नाही, पण दुःखात सर्वात आधी पुढे असतो,” ही भावना लोकांच्या मनात घर करून बसली आहे. शहरापुरतं नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात लोकांच्या अडचणीत आधाराचा हात देणं ही त्यांची ओळख बनली आहे. तीस वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांनी पैशांपेक्षा प्रामाणिकपणाला जपलं; म्हणूनच जनतेच्या मनावर त्यांचं अधिराज्य आहे.

आज चिखलीला हवा आहे असा नगराध्यक्ष जो फक्त पदासाठी नव्हे, तर जबाबदारीसाठी लढेल. सचिन बोन्द्रे यांच्या रूपाने चिखलीला तो आशेचा किरण दिसतो आहे. गेल्या काही वर्षांत असमतोल विकास, बेरोजगारी, रस्त्यांची दुर्दशा आणि स्वच्छतेची कमतरता यांनी शहर त्रस्त झालं आहे. पण आता प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच आवाज आहे “बदल हवा !” हा बदल केवळ आकांक्षांचा नाही, तर कृतीचा आहे. सचिन बोन्द्रे यांच्या नेतृत्वाखाली युवकांना दिशा, महिलांना सुरक्षिततेची हमी आणि वृद्धांना आधार मिळेल, अशी जनतेची श्रद्धा आहे. चिखलीच्या मातीमध्ये सामर्थ्य आहे. फक्त त्याला योग्य हातांची गरज आहे. जेव्हा अशी नितळ प्रतिमेची, संवेदनशील आणि जनतेशी जोडलेली नेतृत्वशक्ती नगराध्यक्षपदी येईल, तेव्हा चिखली पुन्हा उजळून निघेल. प्रत्येक नागरिक अभिमानाने म्हणेल “ही आमची चिखली, आमचा अभिमान!”

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129