
रीलच्या नादात तरुणाचा मृत्यू!; रेल्वे ट्रॅकवर स्टंट करताना जीव गेला
MH 28 News Live / शेगाव : येथून जवळील आळसना रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सोशल मीडियावर रील तयार करण्याच्या नादात एका तरुणाने अक्षरशः स्वतःचा जीव गमावला.

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील शेख नदीम शेख रफिक (वय २२) हा युवक लग्नाच्या रिसेप्शनसाठी आळसना येथे आला होता. दरम्यान, सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास त्याने रेल्वे रूळावर रील शूट करण्याचा निर्णय घेतला. कानात हेडफोन असल्याने समोरून येणाऱ्या रेल्वेचा आवाज त्याला ऐकू आला नाही आणि काही क्षणांतच रेल्वेने त्याला चिरडले.

या भीषण अपघातात नदीमचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत रील शूट करणारा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
सोशल मीडियासाठी रील करताना घ्या खबरदारी
अलीकडच्या काळात इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्युबवर रील तयार करण्याचे वेड युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी अनेकजण धोका पत्करून धोकादायक ठिकाणी स्टंट किंवा शूट करताना दिसतात. परंतु, एक क्षणाची बेपर्वाई जीवावर बेतू शकते, हे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. रील करताना खालील बाबींची खबरदारी घ्यावी—

▪️ रेल्वे ट्रॅक, धोकादायक इमारती किंवा वाहतूक असलेल्या ठिकाणी रील करू नका.
▪️ शूटिंग करताना कानात हेडफोन वापरू नका; आजूबाजूचा आवाज ऐकू येणे गरजेचे आहे.
▪️ रीलसाठी स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
▪️ मनोरंजनासाठी तयार केलेली सामग्री जीवनाचा धोका निर्माण करणारी नसावी.
युवकांनी “व्ह्यूजपेक्षा जीव महत्त्वाचा” हा विचार लक्षात ठेवून जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक आहे.



