
शेतकऱ्याची आर्त हाक; कर्जमाफी द्या, नाहीतर माझी किडनी घ्या…!
MH 28 News Live / मोताळा : शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे संतप्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ३५ वर्षीय शेतकरी शुभम घोंगटे यांनी स्वतःची किडनी विकून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी स्टॅम्प पेपरवर निवेदन देत सरकारसमोर आपली व्यथा मांडली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.
राज्य शासनाने नुकताच शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जीआर जारी केला आहे. मात्र, त्यातील अटी अत्यंत जाचक असल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप होत आहे. शुभम घोंगटे यांनी आपल्या निवेदनात, “शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आम्हाला कर्ज फेडणे अशक्य झाले आहे. २०१९ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती, त्यांना वगळून फक्त ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आमची किडनी घ्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांत आमचे कर्ज फेडा,” अशी आर्त मागणी केली आहे.
तसेच “किडनी विकून पैसे उरले तर इतर शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीसाठी वापरा,” असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या घटनेमुळे राज्यातील शेतकरी संकट पुन्हा एकदा चर्चेत आले असून सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.



