
“तू जेवण चांगले बनवले नाही”… दारुड्या मुलाने देऊळगाव महीत वृध्द आईचे डोके फोडून केले रक्तबंबाळ
MH 28 News Live / देऊळगाव राजा : “तू जेवण चांगले बनवले नाही,” या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने स्वतःच्या ७५ वर्षीय वृद्ध आईवर काठीने बेदम हल्ला करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे घडली. या अमानुष मारहाणीत वृद्ध महिलेचे डोके फुटून त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. जखमी आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल दिनकर खिल्लारे हा दारूच्या नशेत घरी आला. “जेवण चांगले बनवले नाही,” या कारणावरून त्याने आईशी वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घरातील इतर तिन्ही मुले व फिर्यादी यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र संतापाच्या भरात आरोपीने घरातील काठी उचलून आईच्या कपाळावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यात शोभा दिनकर खिल्लारे (वय ७५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. तसेच डाव्या डोळ्याजवळ, उजव्या पायाच्या पंजाला आणि पाठीवरही मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी जखमी शोभा दिनकर खिल्लारे, रा. देऊळगाव मही यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अमोल दिनकर खिल्लारे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बीट जमादार कलीम देशमुख करीत आहेत.



