♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मोफत सेवेचा फलक, तरीही १० रुपयांची वसुली; बुलढाणा बसस्थानकातील शौचालय शुल्कावर प्रवाशांचा संताप

MH 28 News Live / बुलढाणा : येथील एसटी बसस्थानकात “सुलभ शौचालय सेवा सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे” असा फलक लावण्यात आलेला असतानाही प्रवाशांकडून शौचालय वापरासाठी प्रत्येकी १० रुपये आकारले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोफत सेवेच्या फलकाची दिशाभूल होत असल्याचा आरोप केला जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांचा ठेका स्मार्ट कंपनीला दिल्यानंतर १८ जुलैपासून प्रत्येक प्रवासी तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार लागू केला आहे. त्यामुळे स्वच्छतागृह वापरासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचा प्रश्न उपस्थित होत असून, अधिभार भरूनही १० रुपये वसूल केले जात असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

यासंदर्भात बुलढाणा आगाराचे प्रमुख गडलिंग यांनी सांगितले की, पूर्वी स्वच्छतागृहाचा ठेका मेहतर कर्मचारी संघटनेकडे शुल्क आकारण्याच्या अटीवर होता. मात्र आता स्मार्ट कंपनीला ठेका देण्यात आल्याने तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारला जात आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवाशांकडून कोणतेही शुल्क वसूल करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तरीदेखील शुल्क आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी आगार प्रशासनाकडे प्राप्त झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, २२ जुलै रोजी धाड येथील डॉ. सुनील जोशी हे कामानिमित्त बुलढाण्यात आले असता त्यांनी बसस्थानकावरील स्वच्छतागृहाचा वापर केला. त्यावेळी त्यांच्याकडे १० रुपयांची मागणी करण्यात आली. मोफत सेवेचा फलक दाखवून त्यांनी याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्याने उर्मट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर त्यांनी बसस्थानकाच्या तक्रार व सूचना पुस्तकात लेखी तक्रार नोंदवून थेट आगार प्रमुखांकडेही याबाबत दाद मागितली. मोफत सेवेचा फलक, तिकीटावर आकारला जाणारा स्वच्छता अधिभार आणि प्रत्यक्षात सुरू असलेली १० रुपयांची वसुली यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129