
शिक्षिकेचा पाठलाग; ‘तुम्ही मला खूप आवडता’ म्हणत त्याने मागितला मोबाईल नंबर चिखलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
MH 28 News Live / चिखली : येथील शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी चिखली शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 78 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २९) सकाळी ८. ४५ ते ८. ५० वाजण्याच्या सुमारास चिखली येथील अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी या शाळेत जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केला. “तुम्ही मला खूप आवडल्या असून मला तुमच्याशी बोलायचे आहे,” असे म्हणत त्याने फिर्यादीकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४३ / २०२६ भारतीय न्याय संहिता कलम ७८ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व पोलीस उपनिरीक्षक सुधन सुसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे.



