
राहुल बोंद्रेंचे देवदर्शन अन् पर्यटन; संभाव्य भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा नवे वळण
MH 28 News Live / चिखली : राजकारणातील डावपेच, शिक्षण संस्था व सहकारी बँकेच्या प्रशासनाची जबाबदारी आणि विविध प्रापंचिक-व्यावसायिक व्यापातून काही काळ विरंगुळा मिळावा, यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी नुकताच देवदर्शन व पर्यटनाचा दौरा केला. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून बोंद्रे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचे कमळ हाती धरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाची तारीखही निश्चित झाल्याची चर्चा असतानाच बोंद्रे यांनी केलेल्या या दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा नवे वळण मिळाले आहे. नव्या राजकीय इनिंगच्या सुरुवातीपूर्वी देवदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठीच हा दौरा होता का, असा सवाल आता चिखली मतदारसंघात उपस्थित केला जात आहे.
चिखलीचे माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे. १३ ऑगस्ट रोजी मुंबईत त्यांचा भाजपाप्रवेश निश्चित असल्याचेही राजकीय सूत्रांकडून सांगितले जात होते. मात्र, १३ ऑगस्टची तारीख उलटून गेल्यानंतर प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आणि नव्या तारखेपासून प्रवेश कायमचा टळल्यापर्यंत विविध तर्कवितर्कांना उधाण आले. याच काळात बोंद्रे यांनी राजकीय चर्चांपासून काहीसे अलिप्त राहत पत्नी वृषालीताई बोंद्रे यांच्यासमवेत कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्योतिबा आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचेही दर्शन घेत त्यांनी धार्मिक तीर्थाटन केले. त्यामुळे भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय भूमिकेला सुरुवात करण्यापूर्वीच देवदर्शन करून बोंद्रे यांनी आशीर्वाद घेतले का, या चर्चेला मतदारसंघात पुन्हा उधाण आले आहे.
देवदर्शनासोबत राजकीय हितगुजाचीही चर्चा
देवदर्शनाबरोबरच राहुल बोंद्रे यांनी काही दिवसांपूर्वी निधन पावलेले माजी राज्यपाल व ज्येष्ठ काँग्रेस नेते स्व. डी. वाय. पाटील यांच्या कुटुंबीयांची कोल्हापुरात सांत्वनपर भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी त्यांची राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे पन्हाळगड किल्ला आणि मसाई पठार या ऐतिहासिक व निसर्गरम्य पर्यटनस्थळांनाही बोंद्रे दाम्पत्याने भेट दिली. त्यामुळे धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक विरंगुळा आणि राजकीय घडामोडी यांचा अनोखा संगम या दौऱ्यात पाहायला मिळाला.
भाजपाप्रवेशाचे गूढ कायम; नव्या इनिंगची चाहूल ?
एकीकडे चिखली मतदारसंघात राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजपाप्रवेशावरून राजकीय चर्चांना उधाण आले असताना, बोंद्रे मात्र या सर्व राजकीय कोलाहलापासून दूर राहत देवदर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेताना दिसले. या प्रवासातून त्यांनी स्वतःला काही काळ राजकीय चर्चांपासून दूर ठेवले असले, तरी त्यांच्या संभाव्य भाजपाप्रवेशाबाबतच्या चर्चेला मात्र अधिकच हवा मिळाली आहे. नव्या राजकीय भूमिकेपूर्वी देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन बोंद्रे नव्या उमेदीने राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत का, याबाबत आता मतदारसंघात तर्कवितर्क सुरू झाले आहेत. राहुल बोंद्रे खरोखरच भाजपात प्रवेश करणार का आणि केला तर तो नेमका कधी होणार, याकडे चिखलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



