
देऊळगाव राजात कुत्र्यांनी लचके तोडलेले मृत अर्भक सापडले
MH 28 News Live / देऊळगाव राजा : कुत्र्यांनी लचके तोडलेल्या स्थितीत मृत अर्भक सापडल्याने आज (ता. २५) शहरातील संजय नगर परिसरात खळबळ उडाली, दरम्यान पडक्या घरात सापडलेले सदर अर्भक कोणी टाकून दिले तसेच ते स्त्री जातीचे की पुरुष जातीचे आहे, याबद्दल अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी सदर अर्भक ताब्यात घेतले आहे. कुत्र्यांनी लचके तोडलेले अर्भक सापडल्याने समाजमन हेलावून गेले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार संजय नगर येथील बुद्ध विहारा नजीक च्या एका पडक्या घरात काही कुत्रे कशाचेतरी लचके तोडत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. यावेळी सदर बाब नागरिकांनी माजी नगरसेवक सलीम पठाण यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी पोलिसात सूचना दिल्या नंतर लगेच पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर व पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सदर मृत अर्भक ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहीपर्यंत सदर अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे आहे याबाबत स्पष्ट झाले नाही.



