
तहसीलदारांच्या वाहनावर हल्यातला मुख्य आरोपी फरारच… आठवडा उलटूनही हर्षल अंभोरे पोलिसांच्या हाती नाही; अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
MH 28 News Live / देऊळगाव राजा : अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या वाहनावर टिप्पर धडकावून जीवघेणा हल्ला केल्याच्या गंभीर प्रकरणातील प्रमुख आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी १९ ऑगस्ट रोजी अंढेरा पोलिसांत फिर्याद दाखल करूनही आठवडा उलटला असून, टिप्पर मालक हर्षल अंभोरे हा फरार आहे. त्यामुळे अंढेरा पोलिसांच्या तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तालुक्यातील अंढेरा शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचा महसूल पथकाकडून पाठलाग सुरू असताना टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक दिल्याचा आरोप आहे. या धडकेत तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला. सरकारी अधिकाऱ्यांवरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी १९ ऑगस्ट रोजी अंढेरा पोलिसांत टिप्पर चालक तसेच तहसीलदारांचे वाहन अडविणाऱ्या टिप्पर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटना आणि विदर्भ पटवारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी २२ ऑगस्टपासून बेमुदत रजा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावरही परिणाम झाला आहे.
चालक अटकेत; मुख्य आरोपी मात्र फरार
या प्रकरणातील टिप्पर चालक संतोष भोपळे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच वाळू वाहतुकीचे टिप्पर आणि मुख्य आरोपीचे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपी हर्षल अंभोरे अद्याप फरार असल्याने महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शासनाकडून उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित अधिकाऱ्यावरच कथितरीत्या जीवघेणा हल्ला होतो आणि गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनेक दिवस पोलिसांना चकवा देत राहतो, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
मोबाईल बंद; दोन पथके आरोपीच्या शोधात
याबाबत अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शककरघे यांनी सांगितले की, आरोपीने मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडथळा येत आहे. आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून टिप्परसह मुख्य आरोपीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.



