♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘लफडं’ असल्याच्या संशयातून पत्नीचा खून; बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण, पतीला बेड्या !

MH 28 News Live / खामगाव : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीवर बेसबॉल स्टिकने अत्यंत अमानुषपणे हल्ला करून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरातील गोपालनगर परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपालनगर परिसरात गणेश डाबेराव याचे कुटुंब वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास डाबेराव यांच्या घरातून अचानक मोठ्याने आरडाओरड आणि भांडणाचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांच्या घरासमोर धाव घेतली. यावेळी नागरिकांनी गणेश याच्याकडे नेमके काय घडले, याबाबत विचारणा केली.

यावेळी आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. तसेच, ‘माझ्या पत्नीचे कुणासोबत तरी लफडं आहे, त्यामुळे मी तिला संपवले,’ असे त्याने नागरिकांना सांगितल्याचे समोर आले आहे. आरोपीचे हे वक्तव्य ऐकून उपस्थित नागरिकांना मोठा धक्का बसला.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच नागरिकांनी कोणताही वेळ न दवडता शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी पतीला तात्काळ ताब्यात घेतले. पत्नीवर बेसबॉल स्टिकने गंभीर स्वरूपाचा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेमागे नेमका कौटुंबिक वाद काय होता, पत्नीच्या चारित्र्याबाबत आरोपीला संशय का होता आणि हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील संपूर्ण वास्तव स्पष्ट होणार आहे.

खामगावनंतर भंडाऱ्यातही ‘सिनेस्टाईल’ थरार

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील सुकळी गावात पैशांच्या वादातून एका तरुणाने स्कार्पिओ वाहन पळवून नेल्याची आणखी एक धक्कादायक घटना घडली. वाहन थांबवण्यासाठी गावकरी आणि पोलिसांनी तब्बल ३० ते ३५ किलोमीटरपर्यंत थरारक पाठलाग केला.

या पाठलागात तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलीस, ५० हून अधिक दुचाकीस्वार आणि शेकडो नागरिक सहभागी झाले. आरोपीने बेदरकारपणे स्कार्पिओ चालवत असताना एका गाईला धडक दिली. या धडकेत गाईचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना हुलकावणी देत सुसाट वेगाने पळणाऱ्या आरोपीला अखेर मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात चारी बाजूंनी घेरून ताब्यात घेण्यात आले. दिनेश राठोड (३६), रा. वरठी, ता. मोहाडी, असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्कार्पिओ पळवण्यामागील पैशांचा वाद नेमका कोणासोबत होता, याचा तपास सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129