
चोरलेली बाईक घेऊन पळाला पण लोणार पोलिसांच्या जाळ्यात अडकला ! ४ किमी पाठलाग करून सराईत चोराला पकडले; ५ बाईकसह १ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त
MH 28 News Live / ( राहुल सरदार ) लोणार : मोटारसायकल चोरी करून पसार झालेल्या तरुणाला लोणार पोलिसांनी अवघ्या काही तासांत सिनेस्टाईल पाठलाग करून मंठा तालुक्यातील मुरुमखेडा शिवारातून जेरबंद केले. अर्जुन बबन राठोड (वय २०, रा. देऊळगाव कुंडपाळ, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल पाच चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लागला असून, पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे.
देऊळगाव कुंडपाळ येथील शेतकरी प्रकाश किसन सरकटे (वय ४५) यांनी त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीएस-५६७१ ही ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास शेतात उभी केली होती. काही वेळाने मोटारसायकल चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लोणार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अप. क्र. ३५६/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी लोणार-मंठा मार्गावरील तसेच लोणार-तळणी रस्त्यावरील पेट्रोल पंपांच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये एक संशयित व्यक्ती चोरीची मोटारसायकल घेऊन जाताना पोलिसांच्या निदर्शनास आला.
पोलिसांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला असता तो मंठा-उसवद मार्गावर जाताना दिसला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने मोटारसायकल सोडून शेताच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी तब्बल तीन ते चार किलोमीटर त्याचा पाठलाग केला. अखेर स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने मंठा तालुक्यातील मुरुमखेडा गावाच्या शिवारात आरोपीला शिताफीने पकडण्यात आले.
आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने लोणार पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वीही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून अप. क्र. ३४६/२०२६, ३४७/२०२६ आणि ३५२/२०२६ मधील चोरीच्या मोटारसायकलींसह एकूण पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ लाख ५३ हजार रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये हिरो स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, हिरो होंडा एचएफ डिलक्स आणि बजाज सिटी इंडेड या मोटारसायकलींचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, सहायक पोलिस निरीक्षक गजानन कौळासे आणि लोणार पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.



