♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

अवैध धंद्यांवर पोलिसांचा आसूड ! एका आठवड्यात १०५ गुन्हे दाखल; १५३ आरोपींना बेड्या; तब्बल २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

MH 28 News Live / बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम उघडली असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कारवाईचा अक्षरशः धडाका लावला आहे. अवैध दारू, जुगार, गांजा, शस्त्रसाठा तसेच अवैध गौण खनिज आणि रेती वाहतुकीविरोधात गेल्या एका आठवड्यात तब्बल १०५ गुन्हे दाखल करून १५३ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत तब्बल २ कोटी १५ लाख ६७ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

दारू-जुगार अड्ड्यांवर छापे!

अवैध देशी-विदेशी दारू आणि गावरान हातभट्टीविरोधात पोलिसांनी सर्वाधिक ७६ कारवाया करत ७६ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ९२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसरीकडे जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी कारवाई करत जुगार कायद्यांतर्गत २१ गुन्हे दाखल केले. या प्रकरणांत ६३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, २ लाख ९९ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पिस्तूल, चाकू, कोयत्यासह चौघे जेरबंद

अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांनाही पोलिसांनी सोडले नाही. आर्म अ‍ॅक्टअंतर्गत दोन गुन्हे दाखल करून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझीन, चाकू, कोयता, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १ लाख ८६ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच गांजा बाळगणाऱ्यांविरोधात दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १.१७० किलो गांजा, किंमत ५८ हजार ५०० रुपये, जप्त करण्यात आला.

रेती माफियांना कोट्यवधींचा दणका

अवैध गौण खनिज आणि रेती वाहतुकीविरोधातील कारवाईत पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली. चार गुन्ह्यांत आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनांसह तब्बल २ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने अवैध रेती वाहतुकीत गुंतलेल्यांना मोठा आर्थिक दणका बसला आहे.

‘कारवाई थांबणार नाही’

आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अवैध धंद्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसून, अशा प्रकारांत सहभागी असणाऱ्यांविरोधात यापुढेही कडक आणि कठोर कायदेशीर कारवाई सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129