
“होय, मी भाजपात जाणार !” अखेर राहुल बोंद्रेंनी केले जाहीर; काँग्रेसला निरोप देताना केले या दोन महापुरुषांचे स्मरण
MH 28 News Live / चिखली : गेल्या काही दिवसांपासून चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राहुल बोंद्रे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर स्वतः बोंद्रे यांनीच स्पष्टोक्ती दिली आहे. “होय, मी भारतीय जनता पक्षात जाणार,” असे जाहीर करत त्यांनी काँग्रेसमधील आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओद्वारे बोंद्रे यांनी आपल्या राजकीय निर्णयाची माहिती दिली. विशेष म्हणजे, व्हिडिओच्या शेवटी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचे स्मरण केले. या उल्लेखामुळे त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीची चर्चा अधिकच रंगली आहे.
दोन महिन्यांपासून चर्चेला अखेर पूर्णविराम
चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सुरू होत्या. या चर्चांवरून राजकीय वर्तुळासह समाजमाध्यमांवरही विविध प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, काही काळापूर्वी बोंद्रे यांनी काँग्रेस सोडून आपण कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टीकरण एका यूट्यूब वाहिनीशी बोलताना दिले होते. मात्र, आता स्वतःच व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर विराम मिळाला आहे.
काँग्रेसच्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक उजळणी
आपल्या व्हिडिओमध्ये राहुल बोंद्रे यांनी काँग्रेस पक्षाने आजवर आपल्याला भरभरून दिल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम, सन्मान आणि सहकार्य सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी नमूद केले. राजकीय वाटा वेगळ्या झाल्या तरी व्यक्तींमधील नाती, आपुलकी आणि परस्परांचा आदर कायम राहील, असे भावोद्गारही बोंद्रे यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू झाली आहे.
स्वामी विवेकानंद व डॉ. आंबेडकरांचे स्मरण
राहुल बोंद्रे यांनी आपल्या व्हिडिओच्या अखेरीस स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचा उल्लेख केला. स्वामी विवेकानंद हे आपले आदर्श असल्याचे सांगताना त्यांनी हिंदू धर्माबाबत स्वामीजींच्या विचारांचा संदर्भ दिला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांचे विचार यांच्याबद्दल आपल्या मनात कायम आदर आणि प्रेम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप प्रवेशाची घोषणा करताना दोन महापुरुषांचा केलेला हा उल्लेख त्यांच्या संदेशातील महत्त्वाचा भाग ठरला आहे.



