♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

बोंद्रे भाजपच्या वाटेवर; नरुभाऊ खेडेकर स्पष्ट बोलले; पक्षांतराचे कारण, चौकशा आणि पुढील राजकीय शक्यतांवर केले भाष्य !

MH 28 News Live / चिखली : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर चिखलीच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी राहुल बोंद्रे यांच्या निर्णयावर सविस्तर भाष्य करताना त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या; मात्र त्याचवेळी या पक्षांतरामागील नेमके कारण काय, असा थेट सवालही उपस्थित केला. बोंद्रे यांचा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय हा राजकीय आत्महत्या ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना बोंद्रे नेमके कोणत्या कारणासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात आहेत, हे अद्याप आपल्याला कळलेले नाही, असे खेडेकर म्हणाले. त्यामुळे बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाकडे केवळ पक्षबदल म्हणून न पाहता त्यामागील राजकीय परिस्थिती आणि चिखलीतील गेल्या काही वर्षांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाहण्याची गरज असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.

 

भाजप प्रवेशाचे कारण तरी काय?’

राहुल बोंद्रे आणि आमदार श्वेताताई महाले यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ देत खेडेकर यांनी बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशानंतर चिखलीचे राजकीय वातावरण निवळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेषतः बोंद्रे यांच्या समर्थकांवर दाखल झालेली प्रकरणे आणि गुन्हे मागे घेतले जातील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बोंद्रे यांच्या संस्थांच्या कारभारासंदर्भात आमदार श्वेता महाले यांनी विविध चौकशा लावल्या होत्या आणि त्या चौकशांमुळे बोंद्रे यांना बराच काळ कोर्ट-कचेऱ्यांच्या फेऱ्या माराव्या लागल्या, असा संदर्भ देत खेडेकर यांनी याचाही थेट संबंध बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाशी जोडणारा सवाल उपस्थित केला. ‘या त्रासाला कंटाळून बोंद्रे भाजपमध्ये जात आहेत की त्यांना भाजपची विचारधारा पटली आहे ?’ असा आशय व्यक्त करत नेमके कारण आपल्याला उमजले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे बोंद्रे यांच्या पक्षांतरामागे विचारधारा आहे की राजकीय परिस्थितीतून निर्माण झालेली अपरिहार्यता, हा प्रश्न खेडेकरांच्या प्रतिक्रियेतून ऐरणीवर आला आहे.

विखेंचा संदर्भ; ‘पुन्हा काँग्रेसमध्ये येतील ?’

राहुल बोंद्रे ज्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपमध्ये जात असल्याचे सांगितले जात आहे, त्यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भही खेडेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत दिला. विखे पाटील यांचा राजकीय इतिहास पक्षांतराचा राहिला असून काँग्रेसपासून सुरुवात करून शिवसेना, पुन्हा काँग्रेस आणि त्यानंतर भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास झाल्याचे नमूद करत खेडेकर यांनी याच संदर्भातून भविष्यात राहुल बोंद्रे पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात, असे भाकीत केले. हे भाकीत म्हणजे खेडेकरांचे राजकीय मत असले तरी त्यातून त्यांनी बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशाच्या स्थैर्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखलीतील काँग्रेसची राजकीय रचना, भाजपमधील स्थानिक समीकरणे आणि श्वेता महाले-बोंद्रे यांच्यातील पूर्वीचा संघर्ष यांचे पुढील स्वरूप काय असेल, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे.

वैयक्तिक त्रास झाला असेल तर माफी मागावी ’

आमदार श्वेता महाले यांनी राहुल बोंद्रे यांच्याशी कोणतेही वैयक्तिक मतभेद नव्हते, केवळ राजकीय मतभिन्नता होती, असे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवरही खेडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल बोंद्रे यांच्यासह त्यांच्या संस्थांशी संबंधित काही संचालकांवर कारवाई झाली होती आणि त्यातील काही ज्येष्ठ नागरिक संचालकांना अटकपूर्व जामिनासाठी काही काळ फरार राहावे लागल्याचा संदर्भ त्यांनी दिला. त्यामुळे श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांच्यातील संबंध हे केवळ राजकीय वाद होते की त्यामध्ये वैयक्तिक संघर्षाचाही काही भाग होता, याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, जर आमदार श्वेताताई महाले यांच्याकडून राहुल बोंद्रे यांना वैयक्तिक स्वरूपाचा त्रास झाला असेल, तर त्यांनी राहुल बोंद्रे यांची माफी मागून त्यांचे भाजपमध्ये स्वागत करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने चिखलीतील जुना राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून, हा पक्षप्रवेश केवळ काँग्रेसपासून भाजपकडे जाण्याचा निर्णय आहे की त्यामागे गेल्या काही वर्षांच्या संघर्षाची मोठी पार्श्वभूमी आहे, यावरच आता चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129