
पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार ? शासनाला उटणे, साबण, फराळ अन् चॉकलेट पाठवून शेतकरी संघटनांचा निषेध
MH 28 News Live / चिखली : अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीसाठी राज्य शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत क्रांतीकारी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विनायक सरनाईक आणि देविदास कणखर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शासनाला उटणे, साबण, फराळ आणि चॉकलेट पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, उत्पादन हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवाळीचा सण जवळ आला असताना शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा आणि प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळण्याऐवजी केवळ पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आल्याने संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला!’ असा टोला लगावत पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
शासनाच्या मदतीच्या घोषणांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून, प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली. शेतकऱ्यांना तुटपुंज्या अग्रीम मदतीऐवजी हक्काचा पीकविमा, झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई आणि हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची बोळवण न करता मदतीची रक्कम त्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली. जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला परत देण्याची भूमिकादेखील आंदोलकांनी व्यक्त केली.
या आंदोलनात सुधाकर तायडे, अरुण नेमाने, मुरलीधर येवले, गजानन पंडित, भीमराव हिवरकर, विठ्ठल शेळके, औचितराव वाघमारे, खुशालराव कणखर, दत्तात्रय कणखर, प्रभाकर पोटे आणि गजानन हिवरकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन नुकसानभरपाई आणि पीकविम्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा विनायक सरनाईक आणि देविदास कणखर यांनी दिला.



