♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

खळबळजनक…! मलकापुरात अ‍ॅसिड हल्ल्याने खळबळ! प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाला लक्ष्य करणारा हल्लेखोर कोण ?

 

MH 28 News Live / मलकापूर : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. शहरातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक राकेश तलरेजा यांच्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यासह डोळ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिक आणि व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे

गप्पा संपल्या अन् घराकडे निघताच हल्ला!

प्राप्त माहितीनुसार, राकेश तलरेजा हे मलकापूर येथील सिंधी कॉलनी परिसरात आपल्या निवासस्थानाजवळ रात्री उशिरापर्यंत मित्रांशी गप्पा मारत उभे होते. त्यानंतर ते घराकडे जाण्यास निघाले असताना अज्ञात हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकल्याची माहिती आहे. या अनपेक्षित हल्ल्यामुळे त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अ‍ॅसिडमुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचे समजते. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तलरेजा यांच्या वेदनांनी परिसरातील नागरिक आणि मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रकृती गंभीर; जालन्यात उपचार सुरू

घटनेनंतर जखमी तलरेजा यांना तातडीने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दुखापतीचे गांभीर्य आणि डोळ्यांवरील उपचारांची आवश्यकता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी जालना येथील विशेष नेत्र रुग्णालयात पाठविले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

वैमनस्य की अन्य कारण? पोलिसांचा तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोराची ओळख पटविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह विविध शक्यतांची पडताळणी केली जात आहे. व्यावसायिक वाद, जुने वैमनस्य किंवा अन्य कोणते कारण या हल्ल्यामागे आहे का, याचाही तपासातून उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, रात्रीच्या अंधारात घडलेल्या या हल्ल्यामागील सूत्रधार कोण, हल्ल्याचे नेमके कारण काय आणि आरोपी कधी पोलिसांच्या ताब्यात येणार, याकडे आता संपूर्ण मलकापूरचे लक्ष लागले आहे. आरोपीची ओळख आणि हल्ल्यामागील हेतू याबाबत पोलिसांकडून अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129