♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शिक्षक पदभरतीकडे दुर्लक्ष; संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा २९ महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचा दणका. बुलढाणा जिल्ह्यातील ११ महाविद्यालयांचा समावेश

MH 28 News Live : शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत दिलेले आश्वासन वारंवार मोडणाऱ्या २९ महाविद्यालयांवर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने कठोर कारवाई करत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी नवीन प्रवेश प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी घातली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, प्रवेशबंदी असलेल्या महाविद्यालयांची अधिकृत यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महाविद्यालयांवर गेल्या शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) देखील प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी महाविद्यालयांनी लवकरच शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे कायदेशीर प्रतिज्ञापत्र विद्यापीठाकडे सादर केले होते. मात्र, वर्षभरानंतरही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यापीठाने यंदाही प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक माहितीसाठी उपकुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही महाविद्यालयांना शिक्षक पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या अटीवर नामांकन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. यामध्ये जारूड, तिवसा, अमरावती, सिंदखेड राजा, खामगाव, संग्रामपूर, मोताळा, लोणार, लाखनवाडा, बुलढाणा, यवतमाळ, दिग्रस आणि रिसोड येथील विविध महाविद्यालयांचा समावेश आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील प्रवेशबंदी असलेली महाविद्यालये

ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, श्रीरामभाऊ शेळके विधी महाविद्यालय (खामगाव), व्यवसाय प्रशासन महाविद्यालय, सत्यजित सायन्स कॉलेज (मेहकर), स्व. गजानन गावंडे विज्ञान महाविद्यालय (खामगाव), स्व. गणेश शिंगणे कला महाविद्यालय (देऊळगाव मही), सरस्वती महाविद्यालय (शेगाव), श्रीमती तुलसीबाई झांबड वरिष्ठ महाविद्यालय (नांदुरा), श्री सरस्वती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (जानेफळ) तसेच श्रीमती बसंतीबाई चांडक सहकार कला व वाणिज्य महाविद्यालय (डोंगरखंडाळा) यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यापूर्वी संबंधित संस्था प्रवेशबंदीच्या यादीत आहे किंवा नाही, याची खात्री करण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाची पडताळणी करावी, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129