
अल्पवयीन मुलीला पळवले, डोणगाव पोलिसांकडे दाखल झाली तक्रार
MH 28 News Live, डोणगांव : येथील खंडोबा परीसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या 16 वर्षीय अल्पवयीन पुतणीला केनवड जिल्हा वाशिम येथील अकाश रमेश गोळे या युवकाने 24 मे ला पळवून नेल्याची घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राम जोगेश्वरी ता. रिसोड जिल्हा वाशिम येथील एक व्यक्ती डोणगांव येथे खंडोबा परीसरात राहतो. त्यांचा लहान भाऊ हा त्याच्या कुटुंबियांसह जोगेश्वरी येथे राहून शेती करतो. त्याची 16 वर्षीय मुलगी ही केनवड ता. रिसोड येथे ब्युटी पार्लर कोर्ससाठी जात होती, तेव्हा आरोपी अकाश रमेश गोळे हा तिच्या मागे जाऊन बोलून तिच्याशी जवळीक साधत असे.
एक महीन्यापूर्वी सदर मुलीला फिर्यादी असलेल्या काकाच्या घरी डोणगांवला आणले होते. तेव्हापासून मुलगी डोणगांव येथे राहत होती. दि. 24 मेला सकाळी 10 वाजता फिर्यादी व त्याची पत्नी शेतात गेले व फिर्यादीचे आई वडील व सदर भावाची मुलगी हे घरीच होते. दुपारी 3.30 वाजता फिर्यादी काका शेतात हजर असताना फिर्यादीच्या मुलीने फोन करुन सांगितले की आम्ही जेवण करुन कुलर लावुन आजी आजोबा सोबत झोपलो असता दुपारी 2 वाजता जाग आली. तेव्हा 16 वर्षीय अल्पवयीन पुतणी घरात आढळून आली नाही. ही माहीती मिळताच फिर्यादी नातेवाईकासह केनवड येथे आरोपी अकाश गोळेच्या घरी गेले व त्यांच्या आईला विचारपूस केली असता अकाश रमेश गोळे हा सकाळ पासून घरी नाही व कोठे तरी गेला आहे असे त्याच्या सांगितले. माझी पुतणी ही अकाश गोळे याने अमिष दाखवुन डोणगांव येथुन फुस लावुन पळवून नेल्याची पक्की धारणा आहे अशी फिर्याद काकाने दाखल केली. डोणगांव पोलीस स्टेशन येथे आरोपी अकाश गोळे विरुद्ध कलम 363 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गजानन ठाकरे करत आहेत.



