सामाजिक वनीकरणाच्या जंगलाला लागली संशयास्पद आग, हजारो झाडे जळून खाक
MH 28 News Live, लोणार : महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग बुलडाणा परिक्षेत्र लोणार यांच्या अंतर्गत किनगाव जटटू गट ग्रामपंचायतमधिल देवानगर येथे गट क्रमांक १२५ जमिनीवर आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास सामाजिक वनीकरण जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागली. मात्र या आगीचे कारण संशयास्पद आहे.
ही आग लागलेली असताना याच रस्त्यावरून भुमराळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार देवानंद सानप प्रवास करत होते. आग लागल्याचे दिसताच देवानंद सानप यांनी तात्काळ सहकार्यांसह आगीकडे धाव घेतली. पळसाच्या पानांच्या फांद्या तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला, काही प्रमाणात आग विझवण्यात सानप यांना यश आले पण काही ठिकाणी आगीने रुद्र रूप धारण केले होते. अशा ठिकाणी मात्र आग विझवण्यात अपयश आले. आगीमध्ये हजारों वृक्ष जळून खाक झाले. यामध्ये १० हेक्टर वर वृक्ष लागवड झालेली होती त्यापैकी जवळजवळ ८ हेक्टर वर ची वृक्ष होरपळून जळाली आहे. याठिकाणी अनेक वन्यजीव होरपळून मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये साप, उंदीर, पक्षी, पक्षांची अंडी आदींचा समावेश होता.
ही वृक्ष लागवड सन २०१९ च्या पावसाळ्यात झालेली आहे. रोपांची संख्या ११११० एवढी असून यामध्ये पापडा, करंज, आवळा, साग, बांबू, कांचन, शिसम, निम, सिताफळ व इतर प्रजातीचा समावेश आहे.
आगीची माहिती सामाजिक वनीकरण विभागाला देण्यात आली. सामाजिक वनीकरणाचं असं म्हणणं आहे की आम्ही हे वनीकरण ग्रामपंचायत किनगाव जटटूकडे वर्ग करण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे. किनगाव जटटूच्या सरपंच यांच्या सोबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. आता हे वनक्षेत्र नेमके कोणाच्या देखरेखीखाली आहे हे दोघांनी ठरवावं.
सदर आग लागल्यानंतर दोन – तीन तास उलटून गेले होते तरीही कोणीच घटनास्थळी आले नव्हते. त्यामुळे यामध्ये काहीतरी गौड बंगाल असल्याची चर्चा ग्रामस्थ दबक्या आवाजात करत आहेत. सामाजिक वनीकरणाने आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आग लावली का ? हा संशय येत आहे. सामाजिक वनीकरणाने खरोखर किती वृक्ष लागवड केली आज रोजी त्या वृक्षाचे खोदलेले खड्डे कायम आहेत का याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार देवानंद सानप यांनी केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button