
मातंग समाजासाठी बीज भांडवल योजनेसाठी प्रस्ताव पाठवा
MH 28 News Live, बुलडाणा : साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील युवकांसाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी प्रस्ताव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मातंग समाजातील युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि समाजाचे जीवनमान उंचावण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. यात मातंग समाजातील 12 पोटजातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
चालू आर्थिक वर्षात बीज भांडवल योजनेंतर्गत 50 हजार रुपये ते 7 लाख रूपयांपर्यंत जिल्ह्याला 20 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 20 टक्के आणि लाभार्थी सहभाग 5 टक्के, तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग 75 टक्के राहिल. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर 4 टक्के व्याजदर आकारला जातो. अनुदान योजनेंतर्गत 50 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान 10 हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. सदर योजनेचे 75 टक्के कर्ज प्रकरणाचे उद्दिष्टे प्राप्त झाले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती पैकी असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी, कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रासह प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.