
बाई मंदिरात आली आणि चांदीचा नाग चोरून गेली… खामगावातील अजब चोरी
MH 28 News Live, खामगाव : शहरात चोरीच्या घटनेमध्ये वाढ झाली असून भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. स्थानिक अग्रसेन भवन पाठीमागील हनुमान मंदिरात अनेक भाविक पुजेसाठी येत असतात. दोन-तीन दिवसांपूर्वी एक महिला मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली होती व तीने मंदिरातील चांदीचा नाग चोरून नेला. ही बाब काही वेळेनंतर परिसरातील महिलांच्या लक्षात आली.
सदर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या शंकराच्या पिंडेवर चांदीचा नाग बसवलेला होता. हा नाग चोरी गेल्याने मंदिराच्या परिसरातील लोकांनी त्या चोरट्या महिलेचा शोधाशोध केला असता ती मिळून आली नाही. या घटनेमुळे भाविक महिलांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यांनी गावातील बहुतांश सराफा दुकानदारांना याबाबत माहिती दिली. तसेच चोरी गेलेल्या चांदीच्या नागाबाबत माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल असे जाहीर केले आहे.