
पहाटे पहाटेच शिकवणीसाठी जाणारा शाळकरी विद्यार्थी मोटारसायकल अपघातात ठार
MH 28 News Live, बुलढाणा : दोन दुचाकींच्या धडकेत शिकवणीसाठी बुलडाणा येथे येत असलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. बुलडाणा शहरातील धाड नाक्यावर आज, १ एप्रिल रोजी सकाळी पावणेआठ वाजता ही घटना घडली.
शुभम शरद पवार (१६, रा. पांग्री उबरहंडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा चुलतभाऊ यश अशोक पवार (१६) गंभीर जखमी झाला आहे. शुभम आणि यश यंदा दहावीची परीक्षा देत होते. दोघेही दुचाकीने खासगी शिकवणी वर्गासाठी बुलडाणा येथे दुचाकीने येत होते.
सकाळी पावणे आठ वाजता एका दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि पसार झाला. यात शुभम आणि यश गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान अकराच्या सुमारास शुभमचा मृत्यू झाला. शुभमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.



