
शेगाव येथे शुक्रवारी रोजगार मेळावा. खाजगी क्षेत्रात नोकरीची संधी, 600 पदांसाठी होणार मुलाखती
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवार, दि. 23 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रोजगार मेळाव्यामध्ये १३ पेक्षा अधिक उद्योजकांनी ६०० पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे टाटा, महिंद्रा, हिताची सारख्या नामांकित कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवुन त्यांची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधीसुध्दा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाटा या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी दि. 23 डिसेंबर, २०२२ रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही.
पात्र, गरजू व नोकरी इच्छुक उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठीही अर्ज करु शकतील. तरी शेगाव येथे आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधी समवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रां. यो. बारस्कर यांनी केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.