
शाळेत जाता येता काढायचा छेड, ऐन परीक्षेच्या मध्येच केले त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण. अमडापूर पोलीसांनी नोंदवून घेतली तक्रार
MH 28 News Live, अमडापूर : एका १५ वर्षीय शाळकरी मुलीला एकलारा येथील तरुण शाळेत जाता येता त्रास देत होता. तिने याबद्दल घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी त्याची समजूतही काढली होती. मात्र, आपल्या पालकांसमोर मुलीला पुढे त्रास देणार नाही अशी कबुली देणार्या या तरुणाने १६ मार्चच्या रात्री त्या मुलीला घरातूनच पळवून नेल्याची घटना तालुक्यातील पांढरदेव येथे घडली. अमडापूर पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील पांढरदेव येथील सदर १५ वर्षीय मुलगी एकलारा येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. पांढरदेव या आपल्या गावाहून एकलारा येथील शाळेत जाता येतांना तिला स्थानिक सिध्देश्वर मोतीराम पवार हा नेहमी जाता येताना त्रास देत असे. याबाबत मुलीने तिच्या वडिलांना सांगितले होते. त्यानंतर तिच्या वडिलांनी सिध्देश्वरच्या घरी जाऊन त्याच्या हा प्रकार त्याच्या पालकांच्या कानी घातला. तुमच्या मुलीला त्रास देणार नाही, असे तेव्हा आपल्या पालकांसमोर सिध्देश्वरने कबूल केले. परंतु पुढे जे व्हायचे तेच झाले. सिध्देश्वरने त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दि. १८ मार्च रोजी दिलेल्या फिर्यदीत केला आहे.



