
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा – हिंदू जनजागृती समितीची मागणी
MH 28 News Live, खामगाव : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी खामगाव नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या सौ प्रीती नागपुरे , सचिन चांदुरकर( विश्व हिंदू परिषद) रवी माळवंदे (हिंदुराष्ट्र सेना) शिवा भाऊ जाधव( युवा हिंदू प्रतिष्ठान), सागर बरेलवार, सोनू चव्हाण, राकेश सुतवणे, आनंद सिंग उपस्थित होते.
या संदर्भात खामगाव शहरातील श्री लोकमान्य टिळक माध्यमिक शाळा , केला हिंदी विद्यालय, आणि नॅशनल विद्यालय या शाळांमध्ये निवेदन देण्यात आले. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका क्र. 103/2011) दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अनू राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत केंद्र शासनानेही ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे हे कायदाविरोधी आहे,तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणे आणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा 1950’, कलम 2 व 5 नुसार तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 चे कलम 2 नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम 1950’ या कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे.
उच्च न्यायालयाने विशेषतः शासनाला ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी आणि त्यामध्ये सामाजिक संस्थांना सामावून घ्यावे’, असेही आदेश दिले आहेत. यामध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करणे अभिप्रेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या 20 वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते.
या संदर्भात आमच्या खालील मागण्या करण्यात आल्या, शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. या समितीमध्ये हिंदु जनजागृती समिती यथाशक्ती योगदान देऊन याविषयावर जागृती करण्यासाठी आपल्याला साहाय्य करेल. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी. शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा । हा उपक्रम राबवण्यासाठी, तसेच समितीने या विषयावर जागृती करण्यासाठी बनवलेली विशेष ध्वनीचित्रफित विविध केबलवाहिन्या, चित्रपटगृहे यांत दाखवण्याविषयी अनुमतीपत्र मिळावे, ही विनंती ! करण्यात आली.