
इस्राईलमध्ये रस्त्याला मिळणार शिवाजी महाराजांचं नाव
MH 28 News Live : इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळवण्यासाठी इस्राईलचे राजदूत यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची भेट घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चर्चा केली. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ईस्राईल… छळाकडून बळाकडे गेलेल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार उत्सुकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्राईलच्या सांस्कृतिक मंत्रालयाने इस्राईलमधील एका रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांच्या शासनासमोर ठेवला आहे. विविध क्षेत्रांतील कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या लोकांशी चर्चा करून इस्राईलचे राजदूत हे शिवरायांच्या बाबतीत माहिती गोळा करत आहेत. दूतावासामधून आलेल्या निमंत्रणानुसार मुख्य राजदूत कोबी शोषनी यांची भेट झाली. त्यावेळी त्यांच्याशी शिवरायांच्या रोमहर्षक प्रशासकीय गुणांची आणि त्यासंदर्भातील प्रसंगांची चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी दिक्पाल लांजेकर यांनी सांगितलेले मुद्दे ऐकल्यानंतर . कोबी यांनी शिवरायांची प्रशंसा केली. त्यांना कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचा अनुवादित ग्रंथाची इंग्रजी प्रत आणि महाराजांच्या जिरेटोपाचे स्मृतिचिन्ह दिक्पाल लांजेकर यांनी भेट दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्रिखंडात असेच गाजत राहो आणि या शिवयज्ञात सातत्याने आमच्याकडून समिधा अर्पण होत राहोत ही शिवचरणी प्रार्थना.. जय शिवराय… अशी पोस्ट त्यांनी केली आहे.