
विदर्भातील दुसरे आणि बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव ‘ हत्ती पाऊल ‘ हे नवीन पक्षी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला, दुर्मीळ पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची होतेय गर्दी
MH 28 News Live, जळगाव जामोद : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी सध्या पक्षी निरीक्षक आणि पक्षी प्रेमींनी मांदियाळी बघायला मिळत आहे. या परिसरातील धानोरा महासिद्ध गावाजवळ असलेल्या तलाव परिसरात सध्या अतिशय सुंदर आणि दुर्मिळ देशी – विदेशी पक्षांचं वास्तव्य आढळून येत आहेत.
विदर्भात भंडारा जिल्ह्यात फक्त एकच पक्षी अभयारण्य आहे. मात्र, पश्चिम विदर्भात आता एक नवीन पक्षी अभयारण्य नावारुपास येत आहे. ते म्हणजे, ‘हत्ती पाऊल पक्षी अभयारण्य’
पश्चिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्यप्रदेश आणि खान्देशच्या सीमेवर असलेल्या धानोरा महासिद्ध गावाजवळ सातपुड्याच्या पायथ्याशी हे अभयारण्य आहे.
या हत्ती पाऊल तलाव परिसरात उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात देश विदेशातील अनेक दुर्मीळ पक्षी स्थलांतरित होऊन याठिकाणी येतात आणि वास्तव्य करतात.
उत्तर टोकातील हिमालयातून तर अरब देशातील आणि युरोपातील पक्षी या ठिकाणी याकाळात वास्तव्यास येतात.
फारसे कुणालाही माहीत नसलेल्या या नव्या पक्षी अभयारण्यात दुर्मीळ पक्षी येत असल्याने हे ठिकाण बुलढाण्यासाठी पर्यटकांचं आता नवीन केंद्र बनत आहे.पक्षीप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांची या दिवसात या नवीन अभयारण्यात मांदियाळी बघायला मिळत
बुलढाणा जिल्ह्याच्या मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील सातपुड्याच्या कुशीत अत्यंत निर्मनुष्य हा भाग असल्याने देश विदेशातील सुंदर आणि दुर्मीळ पक्षी याठिकाणी वास्तव्यास येत आहेत.
जे पक्षी इतर कुठल्याही पक्षी अभयारण्यात न दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसत असल्याने पक्षी प्रेमी आनंदात आहेत. सुंदर पक्षी दिसत असल्याने पक्षी छायाचित्रकार मोठ्या संख्येने याठिकाणी आता येत आहेत. मात्र हा परिसर विकासाच्या कोसो दूर असल्याने या नव्यानेच आढळलेल्या पक्षी अभयारण्याचा विकास करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.