
अनुराधा परिवाराचे जनक तात्यासाहेब बोंद्रे यांचे निधन
MH 28 News Live, चिखली : चिखलीचे पहिले लोकनिर्वाचित नगराध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण, सहकार व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे बहुआयामी व्यक्तीमत्व आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडील सिध्दविनायक उपाख्य तात्यासाहेब बोंद्रे यांचे शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता वृध्दापकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी राहाते घरी निधन झाले.
परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्था, श्री. मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी, अनुराधा मिशन, अनुराधा शुगर मिल, अनुराधा अर्बन को – आँप. बँक आदींची स्थापना करून स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी शिक्षण, सहकार व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आणि चिखली शहर व परिसराच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले. याबरोबरच त्यांचा साहित्य, आध्यात्म, तत्त्वज्ञान आदी विषयात देखील व्यासंग होता. स्व. तात्यासाहेब बोंद्रे हे चिखली नगर पालिकेचे अध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आले होते. माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या जडणघडणीत तात्यासाहेबांचा सिंहाचा वाटा होता.
आज पहाटे सहा वाजता त्यांचे राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. स्व. तात्यासाहेबांच्या पश्चात जितेंद्र बोंद्रे आणि माजी आमदार राहुल बोंद्रे या मुलांसह सूना, मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार होता. आज सायंकाळी पाच वाजता अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात येत आहेत.